अमळनेर (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी आगार प्रमुखांच्या मनमानी कारभार व वागणुकीविरोधात तीव्र आंदोलन केले. यामुळे जवळपास चक्क एक तास आगार बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
गेल्या महिन्यात एसटी सोसायटीची निवडणूक होती. त्यात काही कर्मचारी बिना परवानगी गैरहजर होते. त्यामुळे अमळनेर आगाराचे ४ ते ५ शेड्यूल बंद होते. त्यामुळे काही वाहक चालकांना डबल ड्युटी करावी लागली होती. यात एसटी आगाराची आर्थिक हानी झाली होती. या कारणास्तव व कुणाच्या घरी व्यक्ती मृत झाल्यास, घरात कुणी आजारी असलेल्या गैरहजर कर्मचाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई व अंशतः वसुलीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रोष व्यक्त केला.
यात कर्मचाऱ्यांच्या ही काही समस्या होत्या, त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले. त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केले. या वेळी आगार प्रमुखांविरोधात कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. त्यात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. मात्र, त्यांच्या उत्तरांनी कर्मचाऱ्यांचे समाधान झाले नाही. दरम्यान, एका पत्रकाराला रेकॉर्डिंग का करत आहेत, असे विचारत त्यांना बाहेर काढा, अशी अपमानास्पद वागणूक ही दिल्याचा प्रकार आंदोलनादरम्यान घडला.