नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. गेल्या एका दिवसात ३ लाख ६२ हजार ७२७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ४ हजार १२० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील कोरोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.
भारतामधील एकूण रुग्णसंख्या दोन कोटी ३७ लाखांहून अधिक झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एक कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ इतकी असल्याचं आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७ लाख १० हजार ५२५ इतकी आहे. देशामध्ये एकूण १७ कोटी ७२ लाख १४ हजार २५६ जणांचं लसीकरण करण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात ४६ हजार ७८१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर ५८,८०५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी ८१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४ टक्के एवढा आहे.