रायपूर (वृत्तसंस्था) देशभर कोरोना लसीकरण मोहीम सुरू असतानाच छत्तीसगडमध्ये एक नवं प्रकरण उजेडात आलंय. छत्तीसगडमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोविड १९ पॉझिटिव्ह आढळले आहेत. छत्तीसगडच्या जाजगीर भागाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार हे गुरुवारी कोरोना संक्रमित आढळले आहेत. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.
उल्लेखनीय म्हणजे, आयएएस अधिकारी असलेल्या यशवंत कुमार यांनी करोना लसीकरण मोहिमेत सहभागी होत लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, दुसरा डोस घेतल्यानंतर तीन दिवसांनी कोरोना चाचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यशवंत कुमार यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यांनी पहिला डोस ८ फेब्रुवारी रोजी घेतला होता. त्यानंतर ८ मार्च रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. मात्र, त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत यशवंत कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.