जळगाव (प्रतिनिधी) झेरॉक्स व केशकर्तनालय दुकाने यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून दि. १ जून २०२१ पासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे जिल्हा सचिव अॅड. जमील देशपांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, शासकीय कामे, नोकरी अर्ज बँकेचे खाते उघडणे, शासकीय मदत लाभ, विमा कामे, आरोग्य विषयक औषधी कागदपत्रे या सर्व कामाकरिता विविध कागदपत्रे यांची झेरॉक्स करावी लागते. मात्र दोन महिन्यापासून झेरॉक्स दुकाने बंद आहेत त्या करीता नागरीक वणवण भटकतात असे चित्र दोन महिन्यापासून दिसत आहे. या बाबत विचार करावा. दरम्यान गेल्या दोन महिन्यापासून केशकर्तनालय बंद आहेत. त्यामुळे अनेकांची ओळख बदलली आहे. नोकरी निमित्ताने मुलाखतीला जाणारे तरुण विद्रुप केसरचनेसह दिसत आहेत. केस वाढल्यामुळे अनेकांना डोक्यावर विविध प्रकारचे आजार निदर्शनास येत आहेत. त्यामुळे ते त्रस्त आहेत. केशकर्तन स्वच्छता व आरोग्याशी निगडित विषय आहे. निवेदनाद्वारे आपणस विनंती आहे की, या दोन्ही प्रकारच्या दुकानांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन दि. १ जून २०२१ पासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडण्याची परवानगी द्यावी, असे यात म्हंटले आहे.
















