यावल (प्रतिनिधी) बोरावल गेट जवळील धनगर वाड्यात मस्करीचा वाद विकोपाला गेल्यानंतर वयोवृद्धाने प्रौढावर चाकूहल्ला केल्याने उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू झाला. प्रभाकर आनंदा धनगर (58) असे खून झालेल्या प्रौढाचे तर रामा ढाके (61) असे हल्ला करणार्या संशयिताचे नाव आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत हल्ला करणारा वयोवृद्धदेखील जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावल शहरातील बोरावल गेट भागात शुक्रवारी सायंकाळी प्रभाकर आनंदा धनगर (58) हे एका दुकानावर बसले असताना त्या ठिकाणी रामा ढाके (61) आले आणि दोघांमध्ये मस्करीवरून सुरू झालेला किरकोळ वाद वाढतच गेला. यात रामा ढाके यांनी प्रभाकर धनगर यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केला तर प्रतिउत्तरात धनगर यांनी देखील एका लोखंडी रॉडने रामा ढाके यांच्या डोक्यावर वार केले आणि हातावर वार केल्याने डावा हात मोडला गेला.
दोघांना जखमी अवस्थेत तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. इरफान खान, अधिपरीचारीका माधुरी ठोके, संजय जेधे, रऊफ खान आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ हलवले मात्र मध्यरात्री प्रभाकर धनगर यांची प्राणज्योत मालवली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान, रोहिल गणेशसह आदींनी घटनास्थळी भेट देत शांतता प्रस्थापीत केली.