यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील रीधूरी येथे घराच्या वापरच्या रस्त्यावरून उफाळलेल्या वादात कुर्हाडीने वार करीत खून करण्यात आला. या हाणामारीत एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. धनराज वासुदेव सोनवणे (50) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
रीधूरी, ता.यावल येथे सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घराच्या वापरच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत धनराज वासुदेव सोनवणे (50) यांच्या डोक्यावर कुर्हाडीने वार करण्यात आला यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले तर सतीश सुखदेव सोनवणे (30) व आरती सतीश सोनवणे (28) या दाम्पत्याला जबर दुखापत झाली.
हाणामारीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, हवालदार राजेश बर्हाटे, देविदास सूरदास, विकास सोनवणे, उमेश चौधरी, रवींद्र मोरे, विजय चौधरी, अरुण नमायते हे दाखल झाले व त्यांनी मृतदेह व जखमी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे, डॉ.इरफान खान, अधिपरिवारीका माधुरी ठोके, आतीश खडके, चेतन भोईटे आदींनी प्रथम उपचार केले. जखमी दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
 
	    	
 
















