औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्यानंतर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. त्यांच्या या कृतीवर सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली. त्यानंतर अखेर खासदार जलील यांनी आपली चूक मान्य केली आहे. होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा, असं जलिल यांनी म्हटलंय.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. इम्तियाज जलील यांच्यावर सर्व स्तरावरुन टीका करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इम्तियाज जलील म्हणाले की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायद्या त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र, मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.
दरम्यान, आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.
औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.
औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार- शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे
औरंगाबाद शहरातील कोरोनाला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. इम्तियाज जलील यांच्यावर तातडीने कारवाई करा. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा” अशी मागणी चंद्रकांत खैरेंनी केली. इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करु, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
नाचताना शरम वाटायला पाहिजे”
“MIM च्या नेत्यांनी लाज गुंडाळून डोक्याला बांधली आहे का? संभाजीनगरमघ्ये लॉकडाऊन स्थगित झाला म्हणून इम्तियाज जलील आणि त्यांच्या पक्षाने मोठा जल्लोष केला. संभाजीनगरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे, परिस्थिती गंभीर असताना जल्लोष करुन नाचताना शरम वाटायला पाहिजे” असं मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.