नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज दिल्लीचे माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. देशवासियांना भाजपच्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे, असं विधान शरद पवार यांनी यावेळी केलं आहे.
नवी दिल्लीत एका भव्य कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. योगानंद शास्त्री ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून दिल्लीतील यापूर्वीच्या शीला दीक्षित सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून योगानंद शास्त्री यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी चर्चा सुरु होती. आजा १७ नोव्हेंबर रोजी या चर्चांना पूर्णविराम मिळाला. याप्रसंगी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दिल्ली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचं संघटन नाही. त्यामुळे आम्हाला इथे जास्त मेहनत करण्याची गरज आहे. अनेक राज्यांमध्ये आमचे साथी पक्षाचं संघटन बनवण्याचे प्रयत्न करत आहेत. इथं आमच्यासोबत काम करणारे अनेक जण आहेत. मात्र देशाच्या राजधानीमध्ये पक्षाची जी स्थिती असायला हवी, त्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही अनेक लोकांसोबत चर्चा करत होतो आणि मला आनंद आहे की दिल्ली विधानसभेचं अध्यक्षपद ज्यांनी सक्षमपणे सांभाळलं, एक चांगला अध्यक्ष विधानसभेचं काम कसं चालवू शकतो याचा आदर्श शास्त्रीजींनी देशासमोर घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची शास्त्रीजींशी चर्चा सुरू होती की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीतल्या संघटनाची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घ्यावी. मला आनंद आहे की आमच्या विनंतीचा स्वीकार त्यांनी केला. फक्त त्यांनीच नव्हे तर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादीमध्ये काम करण्याची तयारी दाखवली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं स्वागत करतो”.
सामान्यांना भाजपाला पर्याय हवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी त्या मार्गाने प्रयत्न करत असल्याचंही पवारांनी सांगितलं. ते म्हणाले, “देशातल्या काही राज्यांत येत्या काही दिवसांत निवडणुका आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की सामान्य जनतेला सांप्रदायिक शक्तीला बाजूला सारण्यासाठी जो पर्याय उभा करण्याची आवश्यकता आहे, ज्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे. तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्याच्या दिशेने आम्ही तयारी करत आहोत. आज त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. पण आम्ही याच दिशेने प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश नक्की मिळेल कारण देशवासियांना BJP च्या हुकुमशाहीमुळे पुढे येणाऱ्या सांप्रदायिक शक्तींमुळे देशातली शांतता भंग होत आहे. त्यामुळे लोकांना आता पर्याय हवा आहे. आणि तो देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. यासाठी आधी आम्हाला आमचा पाया मजबूत करायला हवा. मला आनंद आहे की शास्त्रीजीने दिल्लीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्याची तयारी दाखवली”.