नाशिक (वृत्तसंस्था) संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. सहा महिने होत आहे पण अजून ही निर्णय घेण्यात आला नाही. घटनात्मकपदावर बसून घटनेचे मारेकरी होण्याचे काम तुम्ही करत आहात’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.
तसंच, ‘जर तुमच्यावर कुणाचा दबाव असेल तर तसं जाहीर करावे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला. संजय राऊत हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी भाजपचे नेते वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी सेनेत प्रवेश दिला. यावेळी बोलत असताना गेल्या ६ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून राऊत यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित नसून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. या देशाची राज्यघटनेला महत्त्व देत असताना आम्हाला ज्ञान देतात. जर राज्य आणि देश राज्य घटनेनुसार चालावे असं वाटत असेल तर घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने राज्य घटनेचं पालन केले पाहिजे. राज्य घटनेनं जे अधिकार दिले आहे, त्यानुसार, राज्य कॅबिनेटने जे निर्णय दिले आहे, ते निर्णय राज्यपालांवर बंधनकारक असतात’ असं राऊत यांनी राज्यपालांना ठणकावून सांगितले.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, “विधान परिषदेच्या १२ जागा तुम्ही कशा रिकाम्या ठेवू शकता? आज १० महिने होत आले, तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करताय का घटनात्मक पदावर बसून. तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो? की, जोपर्यंत हे सरकार पाडलं जात नाही आणि माझ्या मनासारखं सरकार येत नाही. तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारसी ज्या केलेल्या आहेत, त्यावर सही करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आले आहेत का? हे राज्यपालांनी स्पष्ट केलं पाहिजे. पण १२ सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान आहे. आणि हा महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचा अपमान आहे.”
नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गिते आणि बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वसंत गिते आणि सुनील बागुल आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. वसंत गिते आणि सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सध्या भाजपमध्ये होते. त्यामुळे आज शिवसेनेत प्रवेश करुन त्यांनी घरवापसी केली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
















