नाशिक (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) चाल तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्हाला ते ओळखून दुरूस्त व्हावं लागेल. नाही दुरूस्त केली तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा थेट सल्ला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिला आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, अनपेक्षित असा निकाल लागला आहे. व्हीप असल्याने पक्षाच्या लोकांचे चुकलेले नाही, मात्र १० आमदारांनी गडबड केली आणि विरोधक त्यांच्या खेळीत यशस्वी झाले, असा आरोप त्यांनी केला. राज्यसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करतानाच आता आपले काय चुकले याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आल्याचे म्हटले. ते काय आपली आरती करणार नाही. त्यांचा गेम यशस्वी ठरला आहे. शेवटी विश्वास ठेवावा लागतो, असे म्हणत महाविकास आघाडीमध्ये कोटा ठरवण्याबाबत वाद नव्हता. कोटा कमी केला काय किंवा वाढवला काय. लोक सांभाळण्यात आम्ही कमी पडलो. ते सांभाळले असते, तर असे झाले नसते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भाजपाला मिळालेली मदत आम्हाला मिळाली असती तर विजय झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल’
शिवसेनेला फायदा होईल ते करणे आता गरजेचे आहे. सिंहावलोकन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे या निकालावरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आहे. 20 तारखेपर्यंत आओ मेरे घर असेच म्हणावे लागेल. विरोधक चालीत यशस्वी झाले. आता आम्हाला चिंतन, मनन करायची गरज आहे. शिवसेनेला फायद्याचे होईल ते वरिष्ठांच्या कानात सांगावे लागेल. आत्ताच योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.