जळगाव प्रतिनिधी : एका व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये अॅड करुन त्यांना दीड कोटी रुपयांचा नफा झाल्याचे स्क्रिन शॉट ग्रुपमध्ये पाठविले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी २५ लाख ३० हजार ५०० रुपयांची रक्कम उकळून सागर गोविंद सोनार (वय ३३, रा. पारोळा) यांची फसवणुक केली. ही घटना दि. ५ नोव्हेंबर ते दि. २२ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा येथे राहणारे सागर सोनार हे धुळे येथे एका खासगी आस्थापनेत अकाउंटंट म्हणून नोकरीस आहे. त्यांना दि. ५ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. त्या ग्रुपमध्ये नफा झाल्याचे स्क्रीनशॉट पाठविण्यासह एक लिंक पाठविली. त्या लिंकवर क्लिक करुन ती ओपन करण्यास सांगितले. शिवाय सोनार यांना गुंतवणुकीसाठी युझर आयडी आणि पासवर्ड देखील दिला होता. दरम्यान, सागर सोनार यांनी १५ दिवसांसाठीच्या प्लॅनमध्ये १० लाख रुपये गुंतवणूक म्हणून पाठविले. त्या गुंतवणुकीवर १ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाल्याचे त्यांना दिसत होते. परंतू ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती.
वेगवेगळ्या बँक खात्यावर स्विकारली रक्कम
त्यातून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यावर सोनार यांच्याकडून एकूण २५ लाख ३० हजार ५०० रुपये ऑनलाईन स्वीकारले. रक्कम स्वीकारत असताना सायबर गुन्हेगारांकडून त्यांना परकीय चलन विनिमयाचा परिणाम व इतरही मेसेज येऊ लागले होते.
परकीय चलनाबाबत आले मॅसेज
सागर सोनार यांनी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी पैसे काढण्यावर परकीय चलन असल्यामुळे याप्रकरणाची माहिती मुख्य कार्यालयाला दिली.
फसवणूकीची खात्री होताच दिली पोलिसात तक्रार
मुद्दल रक्कमही परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची खात्री होऊन सोनार यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.
















