जळगाव / यावल (प्रतिनिधी) इन्स्टाग्रामवर शिवीगाळ करतांना व्हिडीओ तयार केल्याचा कारणावरुन अंत्ययात्रेहून घराकडे परतणाऱ्या तुषार चंद्रकांत तायडे (वय १९, रा. समता नगर) या तरुणाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तुषार गंभीर जखमी झाला. तुषार तायडे याचा मंगळवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.
शहरातील समता नगर येथील रहिवासी चंद्रकांत वामन तायडे यांचा लहान मुलगा तुषार चंद्रकांत तायडे (वय १९) याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले असून तो मजूरी काम करुन वडीलांना हातभार लावित होता. तुषारच्या आजीचे निधन झाल्यामुळे संपूर्ण तायडे कुटुंबिय अंत्यविधीसाठी यावल तालुक्यातील परसाडे येथे गेले होते. अंत्यविधी आटोपल्यानंतर दुपारी ४ वाजता तुषार आपल्या मित्राच्या (एम. एच.१९,ईडी ८८७९) क्रमांकाच्या मोटारसायकलने परसाडे येथून जळगावकडे जाण्यासाठी निघाला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास यावल ते बोरावल रोडवरील पाण्याचा पाटाजवळ तुषारला त्याच्या ओळखीचे संशयीत राहुल आणि विक्रम पंडित सोनवणे (दोघे रा. जळगाव) यांच्यासह ६ ते ७ अनोळखी लोक यांनी अडवले.
लाठ्याकाठ्यांनी क्रूरपणे केली मारहाण
रस्त्यात अडविलेल्या टोळक्याने तुषारला लाथा- बुक्क्यांसह लाकडी काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या छाती-पोटावर तसेच दोन्ही पायांवर अत्यंत कूरपणे मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. मारहाण केल्यानंतर संशयित हल्लेखोर घटनास्थळहून पसार झाले.
अनोळखी क्रमांकाच्या फोनवरुन मिळाली माहिती
सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुलगा घरी न पोहोचल्याने तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी मोठ्या मुलाला फोन केला. मात्र तरी देखील तुषार हा घरी पोहचलेला नव्हता. याचवेळी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चंद्रकांत तायडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी तुमचा मुलगा यावल येथील ग्रामीण रुग्णालयात अॅडमीट असल्याचे सांगण्यात आले.
उपचार सुरु असतांना मालवली प्राणज्योत
मारहाणीत गंभीर जखमी झालेलया तुषारला प्रचंड वेदना होत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलवण्यास सांगितले. त्यानुसार तुषारच्या वडीलांनी त्याला रुग्णवाहिकेने जळगावकडे नेत त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तुषारला मृत घोषित केले.
संशयितांच्या अटकेसाठी जमावाकडून रास्तारोको
तुषारच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णातयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी जोपर्यंत संशयीत आरोपींना अटक होणार नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमीका घेतली होती. यावेळी संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हा रुग्णालयासमोरच्या रस्त्यालगत ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्याच्या एकाबाजूने होणारी वाहतूक विस्कळीत होवून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांवर पैसे खात असल्याचे गंभीर आरोप
पोलिसांकडून संतप्त नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु संतप्त जमावाकडून संशयितांना अटक झाली पाहिजे अशा घोषणा दिल्या जात होत्या. आंदोलनात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत पोलिसांवर पैसे खात असल्याचे गंभीर आरोप केले. त्यामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शाब्दिक चकमकसह पोलिसांसोबत धक्काबुक्की
पोलिसांकडून संतप्त नातेवाईकांची समजूत काढीत असतांना पोलीस व जमावात चांगलीच शाब्दीक चकमक होवून धक्काबुक्की देखील झाली. यावेळी संतापलेल्या जमावाने पोलीसांविरुद्ध घोषणाबाजी केली. दरम्यान, दुपारी २ वाजेदरम्यान आरपीआयचे अनिल अडकमोल यांच्यासह इतरांनी मध्यस्थी करुन हा वाद शांत केला. त्यानंतर तुषारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करील मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
जळगावची टीम यावल नगरपालिकेच्या रणनितीत सहभागी
जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. यावल नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगावहून भाजपाचे काही पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. तसेच या मारहाणीच्या घटनेत ज्या संशयितांची नावे जुळली गेली आहे हे यावल नगरपालिकेच्या प्रचारात सक्रीय सहभागी होते. यामुळे प्रकरणात अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
एलसीबीसह यावल पोलिसांकडून पाच जणांना अटक
खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह यावल पोलीसांचे पथकाकडून संशयितांचा कसून शोध सुरु होता. संशयितांची माहिती मिळताच पोलिसांनी विक्रम पंडीराव सोनवणे (वय ४६), अविनाश सुकलाल सोनवणे (वय २०), विजय रूपचंद सोनवणे (वय २४, सर्व रा. सुजदे, ता. जळगाव), निलेश पंडीत कोळी (वय २४, रा. बोरनारे, ता. जळगाव), कल्पेश निलेश इंगळे (वय १९, रा. असोदा, ता. जळगाव) या पाच जणांना एलसीबीसह यावल पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत अटक केली. तर इतर संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.















