धरणगाव (प्रतिनिधी) आजच्या पिढीतील तरुणांनी स्वतःचे व्यवसाय उभारून रोजगारनिर्मिती करणे गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे अनिवार्य बदल होत आहेत. राजकीय, सामाजिक घडामोडींचे पडसाद तरुणांच्या जीवनावर उमटत आहेत. आजची तरुण पिढी सर्वच पातळ्यांवर स्वत:चे अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तसेच युवकांनी आत्मनिर्भर व्हायला हवे, असे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील राजमुद्रा फूड्स फॅक्टरीच्या उदघाटनावेळी म्हणाले.
गेल्या दोन दशकांपासून जागतिकीकरणासोबत भारतात आलेल्या प्रत्येक बदलास तरुण पिढीनं सर्वाधिक स्वीकारल्याचं चित्र आहे. साहजिकच जागतिकीकरण, भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती आणि त्यासोबत झालेल्या विविध घटनांचा सरळसरळ प्रभाव तरुण पिढीच्या विचारांवर पडलेला आहे. त्यामुळे आधी नोकरी म्हणजे स्थिर आयुष्य हा विचार सोडून तरुण आता व्यवसायाकडे वळत आहे, असंही ते म्हणाले.
अविनाश पाटील या नवउद्योजकाची भरारी
अविनाश पाटील हा नवउद्योजक केळी वेफर व्यवसायात भरारी घेत आहे. फक्त वेफर न तळता त्यांचे पॅकिंग, ब्रँडिंग करून एक नवीन वाट चोखळली आहे. राजमुद्रा फूड्स अंतर्गत प्रकाई मसाला आणि येलो फ्लेव्हर मध्ये केळी वेफर मार्केटमध्ये येत आहेत. या फॅक्टरीचे उदघाटन माझ्या हस्ते झाले याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी केले.
अविनाश पाटील यांनी जळगाव एमआयडीसी येथे ४ हजार स्केवर फूट क्षेत्रात बँकेकडून अर्थसाहाय्य घेऊन अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने केळी वेफर्स उत्पादन सुरू करत आहे. मानवी स्पर्श न होता केळी वेफर्स टायर होऊन पॅकिंग होईल असे नियोजन अविनाश पाटील यांनी केले असून दररोज १० क्विंटल तयार वेफर्स उत्पादन करण्याचे त्यांचे ध्येय आहे. केळीला भाव मिळत नाही अशी शेतकऱ्यांची नेहमीच ओरड असते. शेतकऱ्यांना केळीचा रास्त भाव मिळावा अशी भावना हा व्यवसाय सुरू करताना माझ्या मनात आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.