अमळनेर (प्रतिनिधी) तंबाखू न दिल्याच्या कारणावरून पैलाड भागातील ३८ वर्षीय मुकेश धनगर याचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना दि. २१ रोजी रात्री घडली. निखिल विष्णू उतकर (वय ४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
या प्रकरणी दिनेश भिका धनगर यांच्या फिर्यादीवरून त्यांचे भाऊ मुकेश धनगर (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड) हे रात्री ११ वाजता घराबाहेर गेले होते. त्यावेळी हेडावे नाक्यावर वडाच्या झाडाखाली त्यांचे कोणाशी तरी भांडण सुरू असल्याचे प्रवीण पारधी यांनी सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यावर तंबाखू न दिल्याने मुकेश व आरोपीत वाद होत असल्याचे दिसले.
वाद मिटवण्यासाठी फिर्यादी दिनेश पुढे गेले असता आरोपीने त्यांच्यावर दगड फेकला. त्यामुळे त्यांनी घरी जाऊन मदतीसाठी भावंडांना बोलावून आणले. मात्र परत येताच आरोपी निखिल उतकर हा मुकेशच्या डोक्यात व तोंडावर ओबड धोबड दगडाने मारहाण करत असल्याचे दिसले. जखमी अवस्थेत मुकेशला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, युवराज बागुल, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव व उदय बोरसे यांनी आरोपीस ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. दि.२२ रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश निलेश यलमाने यांनी आरोपीस २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
















