धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सत्ता संघर्ष सुरु आहे. परंतू कधीकाळी महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले, परंतू सध्या वेगवेगळी राजकीय भूमिका घेऊन जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात फिरणारे दोन्ही ‘गुलाबराव एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
धरणगावचे माजी नगराध्यक्ष तथा कधीकाळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि सध्याच्या काळातील माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय असलेले पी.एम.पाटील सर यांची सोशल मीडियातील पोस्ट अनेकांना विचार करायला लावणारी आहे. धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील एका कार्यक्रमात दोन-दोन पालकमंत्री एकत्र येणार आहेत. हे दोघं माजी पालकमंत्री म्हणजे गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील हे होय. हे दोघं मंत्री धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे एकत्र येणार असल्याची कार्यक्रम पत्रिका धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी सोशल मिडियाद्वारे शेअर केली आहे. हा कार्यक्रम ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेला होणार आहे. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे कळतेय.