जळगाव (प्रतिनिधी) खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते. त्यामुळे आता खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे, असा सल्ला राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना दिला आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ना. पाटील पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या रुपाने उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही,असेही ना. पाटील म्हणाले. तर भाजपचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटील यांनी देखील एका माजी सैनिकाला मारहाण केली होती. परंतु, आजपर्यंत त्यांना अटक झालेली नसल्याचे सांगत भाजपला कोंडीत पकडले. सुशांतसिंह राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट पिणारा होता. चीन-भारत तणवाबाबतची बातमी का दाखवली जात नाही. सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी केली जाते. मात्र, गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही?, बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून याबाबत राजकारण सुरू आहे.