अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील लोकमान्य विद्यालय येथील उपशिक्षक भूषण सुरेश महाले यांनी भावीपिढी ही व्यसनापासून दूर रहावी, विद्यार्थी व्यसनमुक्त रहावे आणि व्यसनमुक्त पिढी घडावी यासाठी ‘तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी’ या उपक्रमास जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आयटीसेलचा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘आपला जिल्हा, आपले उपक्रम भाग-२’ या डिजिटल ई-बुकमध्ये अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील,आदर्श शिक्षक भूषण महाले यांच्या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या डिजिटल ईबुकचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे, उपशिक्षणाधिकारी डि.एम.देवांग, या उपक्रमाचे मुख्य सुत्रधार व संपादक शिक्षणविस्तार अधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सपकाळे, प्रवर्तक अरूणा उदावंत, पंकज पालिवाल,राजेंद्र कोळी, आर.आर.पाटील, संदिप पवार, कल्पना पाटील, सोनाली साळुखे, विजया पाटील उपस्थित होते. ईबुक भाग-२ चे प्रकाशन शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले. कोरोना लॉकडाऊनच्या काळात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्हाभरातून उपक्रमशील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमामुळे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजतील आणि विद्यार्थी व्यसनापासून दूर राहतील. दैनंदिन अध्ययन-आध्यापनाचे कार्य करत असतांना विद्यार्थ्यांमध्ये भावी जीवनासाठी जे मूल्ये आवश्यक असतात ते उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविता येतात. व्यसनमुक्त पिढी घडावी यासाठी हा एक अभिनव प्रयोग ठरेल. हा उपक्रम व डिजिटल ई-बुक भाग १ ते ४ शिक्षकांना खुप मार्गदर्शक ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.