जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा दूध सहकारी संघाच्या २० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी तब्बल ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदारसंघात ऐनवेळी उमेदवारी दाखल करून विद्यमान अध्यक्षा मंदाकिनी एकनाथ खडसे यांनाच आव्हान दिले आहे. आ. चव्हाण यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज
दूध संघात एकूण मतदार ४४१ आहेत तर त्यापैकी तब्बल १७९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आजी-माजी आमदारांचाही समावेश आहे. दि. २८ पर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपचे नेते गिरीश महाजन, मंगेश चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापले आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. शेवटच्या दिवशी १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, दिलीप वाघ, महापौर जयश्री महाजन, छाया गुलाबराव देवकर, जयश्री अनिल पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
खडसे यांची जाहीर हरकत
मुक्ताईनगर तालुका मतदार संघातून आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.परंतू बाहेरच्या तालुक्यातील उमेदवार अशा प्रकारे अन्य मतदारसंघात उमेदवारी करू शकत नाही, अशी जोरदार जाहीर हरकत खडसे यांनी घेतली असून शुक्रवारी याच मुद्यावर कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. परंतू दुसरीकडे बाहेरच्या मतदारसंघात अर्ज दाखल करणे अयोग्य असल्याची हरकत खडसे घेत असले तरी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि समर्थनातल्या उमेदवारांनीही एक दिवस आधीच अन्य मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.
कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष
शुक्रवारी या अर्जांची छाननी होणार असून त्यात कोणाचे अर्ज बाद होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. चाळीसगावचे असूनही मुक्ताईनगर मतदारसंघातून अर्ज दाखल करणारे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर जोरदार हरकत घेणार असल्याची घोषणा आमदार खडसे यांनी गुरुवारीच केली आहे. त्यांची हरकत नामंजूर झाली तर त्याविरुद्ध अपिल करण्याची तयारीही त्यांनी करून ठेवली आहे. त्यामुळे छाननी प्रक्रिया दीर्घकाळ लांबण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.