जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहा लाख 31 हजार 241 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केली आहे. या मोहिमेस जळगाव जिल्ह्यात सुरवात झाली आहे. आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 532 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचा समावेश आहे. आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील 6 लाख 50 हजार 602 घरांना भेट देवून 29 लाख 21 हजार 401 नागरिकांची 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासणी करणार आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 घरांना भेट देणार आहेत. या घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येणार आहे. तेथे कोविड 19 ची प्रयोगशाळा चाचणी करून पुढील उपचार केले जाणार आहेत.
कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री करण्यात येईल. तसेच आवश्यक तेथे औषधोपचारासाठी नागरिकांना संदर्भित करण्यात येणार आहे. प्रत्येक पाच ते दहा पथकांमागे एक वैद्यकीय अधिकारी उपचार व संदर्भ सेवा देतील. याशिवाय घरातील सर्व सदस्यांना प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगत त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम 25 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील. यात पहिली फेरी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्ण होईल. दुसरी 14 ते 24 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होईल. पहिल्या फेरीचा कालावधी 15 दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी 10 दिवसांचा असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील आरोग्य पथकांनी आतापर्यंत 2 लाख 36 हजार 479 घरांना भेट देवून दहा लाख 31 हजार 241 नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. या तपासणीत उच्च रक्तदाबाचे 9 हजार 182, हद्यविकाराचे 1 हजार 246, कर्करोगाचे 176, मधुमेहाचे सहा हजार 545, अस्थमाचे 760, किडनी विकाराचे 203, क्षयरोगाचे 1 हजार 216, लठ्ठपणाचे 1 हजार 216 तर अन्य आजारांचे एक हजार 755 रुग्ण आढळून आले आहेत. या तपासणीत ताप किंवा ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटोडे यांनी सांगितले.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे, अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ फिव्हर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी. सध्या सुरू असलेल्या आजारांवरील उपचार सुरू ठेवावेत. त्यात खंड पडू देवू नका, डॉक्टरांकडून नियमितपणे तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार करून घ्यावेत. घरच्या घरी औषधोपचार करू नयेत. कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती गृह अलगीकरण अंतर्गत घरी असेल किंवा रुग्णालयातून दहा दिवसानंतर सात दिवसांच्या गृह अलगीकरणमध्ये घरी असेल, तर अशा व्यक्तींनी सतत मास्क लावावा, खोलीच्या बाहेर पडू नये, दर दोन तासांनी हात स्वच्छ धुवावेत. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमचा वापर करावा. कपडे, भांडी स्वतंत्रपणे वापरावीत. ताप आल्यास किंवा थकवा जाणवू लागल्यास त्वरीत रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.