चोपडा (प्रतिनिधी) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या व्यथा व कामांचा व्याप लक्षात घेता, अंगणवाडी कर्मचारींना वगळण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड नियंत्रण व मृत्युदर कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आरोग्य मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत राबवित आहे. स्थानिक पातळीवर आरोग्य पथके तयार करून रोज ५० घरांना भेटी देण्याचा कार्यक्रम करायचे ठरले आहे. सदर पथकात आरोग्य कर्मचारी आहेत. पण माहिती पुस्तकात आवश्यकतेनुसार महिला व बालकल्याण विभागाची परवानगी घेऊन अंगणवाडी कार्यकर्ती घेण्याची सूचना आहे. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, उपायुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दबावाखाली प्रकल्प अधिकारी परस्पर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट सर्वच कामाला जुंपतात, असा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे.
सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे नियमित सर्व कामे करत आहेत. त्यात आहार वाटप, गृहभेटी, पालक गटातून शिक्षण, वजन मापे, पोषण आहाराची विविध कामे आणि लाभार्थी गटाचे सर्वेक्षणाचे काम करावे लागत आहे. त्यात वरील आरोग्य पथकात त्यांच्या समावेश झाला तर बाकीची वरील नियमित कामे थांबून जातील. तरी वरिष्ठांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या व्यथा व कामांचा व्याप समजून घ्यावा व सदर कामातून मुक्तता द्यावी, अशा आशयाचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी चोपडा यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना अमृत महाजन , लताताई प्रताप पाटील , सिंधुबाई सुभाष पाटील , वसला कैलास पाटील इत्यादी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.