साकळी ता यावल ( प्रतिनिधी) यावल तहसीलदार यांच्या दालनात अनधिकृत प्रवेश करून दमदाटी शिवीगाळ व अरेरावीची भाषा वापरणाऱ्या व्यक्तीस तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रांतधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रांतधिकारी व तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल येथील पुडंलीक बाजीराव बारी याने दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ : ३० वाजेच्या सुमारास यावल तहसील कार्यालयात कोवीड१९च्या संदर्भात तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू असतांना तहसीलदारांच्या दालनात अनधिकृतपणे प्रवेश करत तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना आपण यावल येथील शिवभोजनाचा ठेका आम्हास का दिला नाही? व आम्ही दिलेल्या तक्रारींची निवारण करण्यास विलंब का झाला? असे पुडंलीक बारी याने तहसीलदारांशी असभ्य व बेशिस्त वर्तणुक करून अरेरावीची भाषा वापरून दमदाटी व शिवीगाळ करून कार्यालयात गोंधळ निर्माण केला. दरम्यान घडलेल्या या घटनेच्या संदर्भात तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याशी तात्काळ संपर्क साधून घटनेची माहीती सांगीतली.
दिनांक १ ऑक्टोबर रोजी यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, संगायोच्या नायब तहसीदार बी.बी. भुसावरे, पुरवठा निरिक्षक अंकीता महाजन, कोषागारचे अव्वल कारकुन एम.एफ. तडवी, पुरवठा विभागाचे एस.वाय.तडवी, दिपक बाविस्कर, दिपक भुतेकर, निशा चव्हाण, आर.बी.मिस्त्रि यांच्यासह तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
जळगाव येथे प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रांतधिकारी यांच्या सोबत यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे, जळगाव तहसीलदार चोपडा तहसीलदार, भुसावळ तहसीलदार, मुक्ताईनगर तहसीलदार, जामनेर तहसीलदार यांच्यासह जिल्ह्यातील महसुलच्या विविध अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांना निवेदन दिले. जोपर्यंत या घटनेतील संशयीत आरोपी पुडंलीक बारी याला अटक होत नाही. तोपर्यंत महसुलचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. तरी शासनाने तात्काळ या विषयात लक्ष देवुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.