मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे नेत्यांनी पोलिसांना गुंगारा देत मुंबई लोकल रेल्वेने प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सुरु करा. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.दरम्यान, रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे, सरचिटणीस गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह मनसे नेत्यांनी लोकल ट्रेनने प्रवास करत आंदोलन यशस्वी करून दाखविले.
मनसेचे सविनय कायदे भंग यशस्वी pic.twitter.com/FHXy7EwPcw
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 21, 2020