मुक्ताईनगर प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राशी सिडस यांच्या संयुक्त विद्यमाने कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण विषयी जनजागृती मोहीम व उपाययोजना करण्यासाठी चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात २० हजार हेक्टर कपाशीची लागवड केली असून कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकर्यांना सावध करण्यासाठी व प्रभावी उपाययोजनेसाठी कृषी विभागातर्फे हि मोहिम हाती घेण्यात आले असून खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खा.खडसे म्हणाल्या की, २०२० ह्या वर्षात कोरोनामुळे शेतकर्यांवर मोठे संकट आले आहे. पांढरा कापूस पिकवणार्या शेतकर्यांसाठी बीटी कपाशीवर येणार्या गुलाबी बोंड अळीने नुकसान होऊ नये, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कापूस या नगदी पिकासाठीचा पेरा ७० टक्के क्षेत्रावर शेतकर्यांनी केला असल्याने भविष्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता कृषी विभागाला जाणवू लागली आहे.
हा धोका होऊ नये म्हणून राशी सीड्सच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू झाली आहे यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या असून उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकर्यांनी एकरी ५ कामगंध सापळे लावून डोम कळ्या व किडलेली फुले नष्ट करावेत. पीक फुलोरा किंवा व बोंड धारण अवस्थेत असताना फवारणी करण्यात यावी यात पाच टक्के निंबोळी अर्क अथवा १५०० पीपीएम आयझरकर्टीन म्हणजे निमार्क हे २५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात अथवा जैविक बुरशीनाशक बिव्हेरिया बॅसियाना १.१५% हे ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. ही फवारणी करताना वातावरणात पुरेशी आद्रता असावी. बोंड अळीचे ५% नुकसान आढळल्यास थायोडीकॉम ७५% डब्लू पी २५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५% इसी २५ मिली किंवा क्लोरो पायरी फॉर्स २५% प्रवाही २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी यासाठी कामगंध सापळे राशी सीड्स मार्फत शेतकर्यांना पुरविण्यात येत आहे अशा सूचना व शेतकर्यांसाठी जनजागृती कृषी विभागामार्फत मुक्ताईनगर तालुक्यात सुरू करण्यात आली आहे.
संपूर्ण तालुक्यात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे याप्रसंगी बोदवड पंस समिती सभापती किशोर गायकवाड, कृषी अधिकारी, राशी सिडसचे टेरिटेरी मॅनेजर चेतन शिंदे, बोदवड शहर शहराध्यक्ष प्रदीप बडगुजर, सरचिटणीस निलेश पाटील, मुक्ताईनगर तालुका भाजयुमो अध्यक्ष अंकुश चौधरी, शुभम पाटील व तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थित होते. शेतकर्यांनी कपाशी बोंड वरील बोंड आळीचे सूक्ष्म निरीक्षण करून तातडीने उपाययोजना कराव्यात व कीड नियंत्रण फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.