धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस स्थानकात सेवा बजावत असलेल्या सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वृत्तास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दुजोरा देत दु:ख व्यक्त केले.
येथील पोलीस स्थानकात सेवा बजावत असलेल्या ५७ वर्षीय सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे मध्यरात्री कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एक सप्टेंबर पासून हे सहाय्यक फौजदार जिल्हा रुग्णालयात दाखल होते. परंतू मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. दरम्यान, धरणगाव तालुक्यात आतापर्यंत १६३९ रूग्ण झाले असून यापैकी ४४ रूग्ण मयत झाले आहेत. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढतो असून आतापर्यंत तब्बल दोन हजार ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैव म्हणजे आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात शहर-ग्रामीण मिळून तब्बल ४८ पोलिसांचे बळी कोरोनामुळे गेले आहेत. दुसरीकडे नागपूर पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अखेर मदत मिळाली आहे. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दु:ख व्यक्त एक जेष्ठ आणि प्रामाणिक सहकारी गमावल्याची भावनिक प्रतिक्रिया नोंदवली आहे.