मुंबई (वृत्तसंस्था) काही आयपीएस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असे मी बोलल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. मी असं काहीही बोललेलो नाही, माझ्या तोंडी ते वक्तव्य टाकण्यात आल्याचे देखील देशमुख यांनी म्हटले आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषेदत बोलत होते.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यात एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. मात्र, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, असे बोलल्याबाबत आज पुण्यात पत्रकारांनी गृहमंत्री देशमुख यांना प्रश्न विचारला. यावर देशमुख म्हणाले की, लोकमत वृत्तपत्राने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती निराधार आहे. माझ्या तोंडामध्ये तसे व्यक्तव्य टाकण्यात आले आहे. मी असे कुठेही बोललो नाही. जर आपण यासंदर्भातील युट्यूबर असलेला माझा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल.
संबंधित वृत्तानुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदारांना तुमच्या फायली आमच्याकडे आहेत अशा शब्दांत धमकावणे, त्यांना राजीनामा द्यायला सांगणे असे प्रकार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अनिल देखमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चेनंतर हे प्रकरण योग्य प्रकारे मार्गी लावण्यात आले, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतच्या मुलाखतीत म्हटल्याचे वृत्त वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतू माझ्या तोंडी हे वाक्य टाकले आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल, असं देशमुखं म्हणाले. चुकीचं वक्तव्य माझ्या तोंडी घालण्यात आलं आहे, असंही देशमुख म्हणाले.