जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी एका माजी मंत्र्यांच्या अश्लील व्हिडीओ क्लिपबाबत वक्तव्य करत काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. तर मागील वर्षी भाजपच्या एका नेत्याचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राजकारणात भूकंप आला होता. परंतू ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’ असो की, ‘फर्दापूर रेस्ट हाऊस कांड’ जळगाव जिल्ह्याला अशा कामवासनांच्या घटनांचा इतिहास तसा जुनाच आहे. या लेखातून आपण तो जाणून घेऊ..!
सलग दोनवेळेस विजय मिळवीत जळगाव लोकसभा मतदार संघावर आपली पकड निर्माण केल्यानंतर सोशल मीडियातील कथित अश्लील फोटोंचे राजकारण करत भाजपातील अंतर्गत विरोधकांनी ए.टी.पाटील यांचा पद्धतशीरपणे राजकीय गेम केला होता. त्यानंतर खासदार ए.टी.नाना पाटील यांनी तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि मंत्री गिरीश महाजन यांनी माझा घात केला, असा आरोप पारोळा येथे झालेल्या सभेत केला होता. तिकीट कापले गेल्यानंतर मात्र, या प्रकरणावर कुणीही भाष्य केले नाही. परंतू निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सगळीकडे याच विषयाचे चर्वण सुरु होते. दैनिकांसह सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात दररोज बातम्या प्रसारित होत होत्या.
ए.टी.पाटील यांचे प्रकरण शांत झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी एका मंत्र्याच्या पीएची महिलेसोबतची अश्लील क्लीप माझ्याकडे आहे. तो मंत्री व पीए कशा पद्धतीने काम करतात, याची वरिष्ठांना माहिती दिली असल्याचे सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी खळबळ उडवून दिली होती. आपल्या वक्तव्यात त्यांनी मंत्र्याचे नाव घेतले नसले तरी, त्याबाबत जामनेरच्या प्रफुल्ल लोढा यांना विचारा म्हणून सूचक इशारा देऊन टाकला होता. खरं म्हणजे जामनेर तालुक्यात याआधी देखील एका लोकप्रतिनिधीचे फर्दापूर रेस्ट हाऊस कांड खूप गाजले होते.
‘एका तरुणीसोबत लोकप्रतिनिधीचे अश्लील चाळे’ या आशयावर अनेक दिवस दैनिकांमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. जामनेरच्या एका बड्या नेत्याचे नाव रेस्ट हाऊस कांडसोबत जोडले गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. अनेक दैनिकांनी हा मुद्दा लावून धरला होता. परंतू नंतर हा मुद्दा मागे पडला, पुढे आरोप फेटाळले गेले आणि कालांतराने हा विषय पडद्याच्या आडच गेला. आज अनेकांना असं काही आणि जिल्ह्यातील अमुक नेत्याबरोबर घडले होते, याबाबत माहिती देखील नाही.
पाचोरा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार दिलीप वाघ यांच्याविरुद्ध औरंगाबाद येथील तरुणीवर सरकारी विश्रामगृहात बलात्कार केल्याप्रकरणी २५ फेब्रुवारी २०११ रोजी गुन्हा दाखल झाला होता. विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाही आमदार वाघ व त्याचा पीए महेश उर्फ बंटी माळी यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घालून सिंहगड या सरकारी विश्रामगृहाचा ताबा घेत तेथेच पीडित युवतीवर बलात्कार केल्याची तक्रार पिडीत तरुणीने पोलिसांत दिली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. तर जळगावचे तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटील व त्यांच्या सहकार्यांनीच खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे दिलीप वाघ यांचे म्हणणे होते. या प्रकरणातही बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते.
कधीकाळी १९९३-९४ मधील जळगावातील कथित सेक्स स्कॅँडलच्या कॅसेटने देखील कधी काळी धुमाकूळ घातला होता. विधानसभेत दिलेल्या त्या कॅसेटमध्ये नेमकं कोण होते, हे आजतागायत समजून आलेले नाही. ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’शी संबंधित वेगवेगळे तब्बल २० गुन्हे दाखल होते. जळगावातील वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये तीन खून झाल्याचे देखील एकनाथराव खडसे विधानसभेत सांगितले होते. एवढेच नव्हे तर, सभागृह अध्यक्षांना वासनाकांडची कॅसेट देखील दिली होती. भुसावळमध्ये ड्रग्ज विकले जाते. यावर आपल्या तक्रारीवरून कारवाई झाली आणि त्यातून जळगाव सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. त्यामुळे जे मुंबई स्फोटातील आरोपी आहेत,तेच सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी असल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला होता.
‘सेक्स स्कॅन्डल’ तपासाचा वेग जसं-जसा वाढू लागला,तसं साधारण ३२ जणांना अटक झाली. जळगाव व भुसावळ येथील दोन मोठ्या घटना प्राथमिक तपासात समोर आल्या होत्या. त्यात भुसावळची घटना आधी घडलेली होती. तपासात कालांतराने पीडितांची संख्या आणि गुन्ह्यांची व्याप्ती वाढली. या स्कॅन्डलमध्ये तब्बल ३०० ते ५०० पिडीत महिला, मुलींचे शोषण झाल्याची चर्चा त्यावेळी समोर आली होती. जळगाव शहरात वेगवेगळ्या लैंगिक शोषणाच्या घटनांमधून त्याकाळात तीन खून झाले होते. तर आपली तक्रार घेऊन हायकोर्टात गेलेल्या एका महिलेला जिवंत जाळण्यात आले होते.
जळगाव सेक्स स्कॅन्डल प्रकरणात जळगावचा एक विद्यमान नगरसेवक, दोन डॉक्टर आणि एका नेत्याच्या मुलाला अटक झाली होती. दुसरीकडे भुसावळ मधून एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीच्या काळात समोर आलेली सर्वच संशयित ही राजकारणासह शहरातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात प्रत्येक कट्ट्यावर सगळीकडे याची एकच चर्चा सुरु असायची. या सर्व गोष्टी शहरातील एका अपार्टमेंट व तिरुपती नामक हॉटेलमध्ये सुरु होत्या आणि ही हॉटेल आधीच एक टोळी वापरत होती.
भुसावळमधील राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलेल्या वकीलावर भुसावळ मधीलच डॉक्टरच्या रुग्णालयातील एका नर्सने बलात्काराचा आरोप केला होता. २ जुलैला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भुसावळमधील एका वैद्यकीय अधिकारीने २५ जून रोजी पिडीतेच्या वतीने सामुहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. त्यात एका डॉक्टरसह तीन जण आरोपी होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी याप्रकरणात ४९ पिडीतांची नावे,सामोर आल्याचे सभागृहात सांगितले होते. तसेच आ. एकनाथराव खडसे यांनी सभागृहात दिलेली कॅसेट बघितल्यावर काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, ‘जळगाव सेक्स स्कॅन्डल’ प्रकरणातील बहुतांश आरोपी निर्दोष सुटले होते. पण तोपर्यंत या वासनाकांडामुळे अवघ्या जगात जळगावची कधीही पुसून न निघणारी बदनामी झाली होती.