मुक्ताईनर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट रोजी फेकलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मारेकरी, मयत महिला, खून झाल्याचे घटनास्थळ हे सर्व मुक्ताईनगर बाहेरील असल्यानंतरही पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने या खुनाचा उलगडा केला आहे.
मलकापूरमधील नगर परिषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी महिला श्रीमती प्रभा माधव फाळके यांची अतिशय क्रुरपणे हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस २९ ऑगस्ट रोजी फेकून देण्यात आला होता. श्रीमती प्रभा माधव फाळके (वय ६३) रा.गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. परंतू त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही. २९ ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुडे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह पोलिसांनी पुलाच्या वर काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पुर्ण करून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन सदर महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मलकापूर पोलीस निरीक्षकांना मयत महिलेचे फोटो पाठवले होते. त्यांनी ते फोटो परिसरात सोशल मीडियात टाकत ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी श्रीमती प्रभा फाळके ह्या घरून निघून गेल्याची तक्रार त्यांचा मुलगा रितेश माधव फाळके हा मलकापूर शहर पो.स्टे.ला देण्यास गेले असता त्याठिकाणी त्यांना सदर फोटो दाखविण्यात आले. तेव्हा त्यांनी सदर महिला माझी आई असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर शहरात येवून या खुना संदर्भात माता महाकाली नगर, एसटी बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली. अखेर त्या अनोळखी महिलेचा मुक्ताईनगर येथे प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा मलकापूर येथील प्रभा फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सदर मृतदेहाची मुक्ताईनगर पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केल्यानंतर त्याच दिवशी २९ ऑगस्ट रोजी मृतदेहावर पोलिसांकडून मुक्ताईनगर येथेच अंतीम संस्कार करण्यात आले असल्याची माहिती मुक्ताईनगर पो.स्टे.चे पीआय शेवाळे यांनी दिली.
याप्रकरणी काल दि.31 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि.किरणकुमार बकाले, मुक्ताईनगर पो.नि.शंकर शेळके,ए.पी.आय शेवाळे,पो.काॅ.रवि धनगर, धर्मेंद्र ठाकुर, राहुल बेहरवाल, नितिन व्यवहारे मलकापुर शहरात दाखल झाले. नियोजनबध्दरित्या तपासचक्रे वेगाने फिरवत फाळके यांच्या घराशेजारी राहणाऱ्या विश्वास भास्कर गाढे (वय 50) आणि भार्गव विश्वास गाढे (वय 21 रा.गणपती नगर,मलकापुर) या दोघा बापलेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रभा शेळके यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी बापलेकांनी त्यांच्या राहत्या घरात प्रभा फाळके यांचा निर्घुण खुन करुन त्यांच्या गळ्यातील पोथ,गोफ,अंगठी असा दोन लाखांचा मुद्देमाल काढून घेत फाळके यांचा मृतदेह जाड प्लाॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरुन दोघा बापलेकांनी मोटारसायकल वरुन घोडसगांव (चिखली) मार्गे बऱ्हाणपुर रोडवरील कुंड गावानजीक पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकुन दिला. खुनप्रकरणी दोघा बापलेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली आहे.
सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि मुथुट गोल्ड फायनान्समधून मिळाला पुरावा
पो.नि.शंकर शेळके यांचे पथक मलकापूर येथे गेल्यानंतर तपासाला सुरुवात केली. त्यानुसार प्रभा फाळके या मंदिरात जातांना आणि नंतर घराकडे येणाऱ्या रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होत्या. त्यामुळे घराकडच्या परिसरात प्रभा फाळके यांचा घात झाल्याचे पो.नि.शेळके यांनी ओळखून घेतले. त्यानुसार त्यांनी तपास कौटुंबिक सदस्य आणि शेजारील लोकांकडे वळवला. त्यातून त्यांना माहिती मिळाली की, शेजारी राहणारे गाढे परिवारासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध होते. अगदी प्रभा फाळके या दिवसभर गाढे यांच्याच घरी राहायच्या जेवणही तिथंच करायच्या. दुसरीकडे पो.नि.शेळके यांच्या हाती आता सीडीआर आला होता. त्यात प्रभा फाळके यांना शेवटचा फोन भार्गव गाढे याने केला होता. त्यानुसार त्यांनी भार्गवच्या फोनची माहिती काढली तर तो घटनेच्या दिवशी मृतदेह आढळला त्या परिसरात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पो.नि.शेळके यांनी मलकापूर ते घोडसगावमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघं बाप बेटे दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना स्पष्ट दिसून आले. परंतु एवढे असूनही मारेकरी खुनाची कबुली देत होते. त्यामुळे खुनाचा उद्देश लक्षात येत नव्हता.
पो.नि.शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता भार्गवला घेतले ताब्यात
यानंतर पो.नि.शंकर शेळके भार्गव गाढेचा मोबाईलचा सीडीआर पुन्हा एकदा तपासायला घेतला. त्यात त्यांना मुथुट गोल्ड फायनान्सचे काही मॅसेज दिसले. पो.नि.शेळके लागलीच मुथुट गोल्ड फायनान्सचे ऑफिस गाठले आणि २७, २८ तारखेला कुणी-कुणी सोनं गहाण ठेवून पैसे घेतले त्याची यादी मागितली. यादी सामोर येताच पो.नि.शेळके यांच्या हाती मोठा पुरावा लागला. कारण भार्गवने सोनं गहाण ठेवत १ लाख ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. सोन्याचे फोटो काढून प्रभा फाळके यांच्या मुलाले दाखवले असता, त्याने दागिने आपल्या आईचे असल्याचे ओळखले. यानंतर पो.नि.शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता, भार्गवला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे पोलीस चौकशी करत असल्यामुळे तो पळून जाण्याच्या बेतात होता. पण पो.नि.शेळके यांनी तत्पूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
अशी दिली खुनाची कबुली
सर्व पुरावे समोर ठेवूनही भार्गव खुनाची कबुली देत नव्हता. शेवटी खाक्या दाखवताच त्याने सर्व हकीगत सांगितली. वडिलांना दारूचे व्यसन आहे. तसेच माझ्यावरही पन्नास हजाराचे कर्ज होते. तशात वडिलांनी दारूच्या नशेत २७ तारखेला प्रभा फाळके यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून ठार करत अंगावरचे सोने काढून घेतले. त्यानंतर मृतदेहाचे गासोडे बांधत फेकून दिली. दरम्यान, पाळधी येथील स्वप्नील शिंपी खून प्रकरणानंतर पुन्हा एका जटील गुन्ह्याचा पो.नि.शेळके यांनी यशस्वी उलगडा केला आहे.
Comments 1