जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथील बैठकीत जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा झाली. त्यात कोणत्याही राजकीय मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याची, माहिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना दिली आहे. दरम्यान, या बैठकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशावर चर्चा होणार असल्याचे जोरदार वृत्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते काही लपवताय?, की खरं बोलताय हे आगामी काळातच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक मुंबईत झाली. यात भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होण्याच्या चर्चेला जिल्ह्यात ऊत आला आहे. खडसे यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप करायला सुरुवात केल्यानंतर खडसे यांच्या पक्षांतराची चर्चा होती. मागील काही दिवसापासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, या चर्चेने जिल्ह्याच्या राजकारणात जोर धरला आहे. दरम्यान, ‘द क्लिअर न्यूज’ने माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित आहेत. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा झाली. येथे कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झालेली नाही. तसेच खडसे यांच्या प्रवेशाचा विषय निघाला नाही. तर अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी देखील बैठकीत रखडलेल्या सिंचन प्रकल्पांवर चर्चा सुरु असल्याचेच सांगितले. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आदी नेते हजर आहेत. या बैठकीत एकनाथराव खडसे यांच्या पक्षातील प्रवेशाबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतू जिल्ह्यातून माजी मंत्री गुलाबराव देवकर व आमदार अनिल भाईदास पाटील यांनी वेगळी प्रतिक्रिया दिल्यामुळे खडसे यांच्या प्रवेशाचे गूढ अधिक वाढले आहे.