जळगाव प्रतिनिधी । कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याचा संतापजनक प्रकार शहरातील गणपती हॉस्पिटलमध्ये घडला आहे. दरम्यान, सोशल मीडियात वृत्त प्रसारित झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी २० दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर त्यांना जळगावातील गणपती हॉस्पिटलमध्ये ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २४ सप्टेंबर रोजी दुपार ४ वाजेच्या सुमारास रूग्णाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान, नातेवाईकांनी अडीच लाख रूपये भरलेलेले असतांनाही ग्णालय प्रशासनाने असंवेदनशीलतेचा कळस गाठत उर्वरित १ लाख ११ हजार रूपयांचे बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतू आर्थिक स्थिती नसल्यामुळे नातेवाईकांनी अजून पैसे देवू शकत नाही, अशी विनंती केली.या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. याची माहिती नातेवाईकांनी नोडल ऑफिसर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांना दिली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. परंतू याकाळात नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.