पुणे (वृत्तसंस्था) अजित पवार यांना महापालिकेतील सत्तेबाबत स्वप्न पडत आहेत. मात्र, त्यांनी आपली ऊर्जा वाया घालवू नये. आम्हीही तुमचे बाप आहोत. पवारांवर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांची जीभ घसरली आहे.
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरुड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. पालकमंत्री झाल्यानंतर पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांनी हाच धागा पकडून पवारांना ऊर्जा वाया न घालविण्याचा सल्ला दिला आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून सर्व पदे भाजपकडे आहेत. आपण सर्वाधिक मोठ्या पक्षाचे सदस्य असून त्याचा अभिमान वाटला पाहिजे; तसेच जबाबदारीनेही वागले पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.