मुंबई (वृत्तसंस्था) जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी २०१६मध्ये माजी सैनिकावर हल्ला केला होता. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी आदेश दिले आहेत.
पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्याच्या प्रश्नावर भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर केलेल्या मुद्द्यावर बोट ठेवले होते. खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती. याप्रकरणी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशी आदेश दिले आहेत. देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, २०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, “२०१६ साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर २०१९ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई पाटील यांच्यावर झाली नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.