जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दोन आमदारांना करोनाची लागण झाली आहे. चाळीसगाव येथील भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. मात्र, त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याने ते घरीच ‘ क्वारंटाईन’ झाले आहेत. याबाबत त्यांनीच सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
चाळीसगाव येथील भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण युवा आमदार आहेत. आमदार चव्हाण यांनी करोनाची लक्षणे जाणवत असल्याने आपली करोना तपासणी करून घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण यांचा उद्या, २३ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना देखील करोनाची लागण झाली आहे. करोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांची आपली करोना चाचणी करून घेतली. त्यात त्यांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदार किशोर पाटील यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. करोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आपल्या घरीच क्वारंटाईन झाले आहेत.