नागपूर (वृत्तसंस्था) अल्पवयीन आरोपींना अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नागपूरच्या जरिपटका भागातील रॉयल बारमध्ये तलवारीच्या धाकावर तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन आरोपींची पोलिसांनी अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. यावेळी पोलिसांनी आरोपींच्या हाताला दोरखंड देखील बांधला होता. या आरोपींना अर्धनग्न रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी अल्पवयीन असल्याने नागपूरच्या पोलीस आयुक्तांकडून या घटनेची गंभीर दखल घेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, रॉयल बारमध्ये तलवारीच्या धाकावर या अल्पवयीन आरोपींनी तोडफोड करत रोख रक्कम आणि दारुच्या बॉटल्स चोरल्या होत्या.