सोलापूर (वृत्तसंस्था) किरकोळ कौटुंबिक वादातून छोट्या भावाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापुरातील तक्षशिला नगर, कुमठा नाका परिसरात घडली आहे. रोहित बनसोडे असे मयत तरुणाचे नाव असून त्याचा लहान भाऊ राकेश बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी (४ ऑक्टोबर) रोजी दुपारच्या सुमारास रोहित आणि राकेश यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास मयत रोहित बनसोडे याचा मित्र सुरज कसबे हा घरी आला होता. सुरज याने रोहित याला आवाज दिला मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नव्हता. यावेळी सुरज याने पाठीमागील भिंतीवरुन घरात प्रवेश केला असता रोहित हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले. सुरज कसबे याने घाबरुन ही माहिती पोलिसांना कळवली. दरम्यान, मयत रोहित बनसोडे हा आपला मोठा भाऊ असून तो वारंवार आपला अपमान करत होता. किरकोळ कारणावरुन मारहाण करत होता. रविवारी देखील रोहित याने मारहाण केली होती. त्याच रागात आपण घरातील लोखंडी बटाने डोक्यावर मारहाण केली. अशी कबुली आरोपी राकेश बनसोडे याने दिली असल्याचे पोलिसांनी सांगीतले.