पाळधी ता. धरणगाव (शहबाज देशपांडे) धरणगाव उपजिल्हा रुगणालय, बालकवी ठोंबरे स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाळधी येथील जाहीर सभेत दिले. तसेच गुलाबराव पाटील हे प्रामाणिक आणि कडवट शिवसैनिक आहेत, त्यांच्या पाठीशी रहा असे भावनिक आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
जळगाव ग्रामीणमधील सर्व कामांना दिली जाईल गती
काही लोकांनी पाण्याच्या योजेनेबाबत फक्त पत्रकार परिषदा घेतल्या. परंतू मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले आहे. तसेच स्वतंत्र पाळधी पोलीस स्टेशन, धरणगाव उपजिल्हा रूग्णालयासह बालकवी ठोंबरे स्मारकासह जळगाव ग्रामीणमधील सर्व प्रकल्पांना चालना देण्याचे काम करण्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
गुलाबराव शिवसेनेची बुलंद तोफ, मी त्यांचा चाहता !
गुलाबराव पाटील हे शिवसेनेची बुलंद तोफ आहेत. मी देखील त्यांच्या भाषणाचा चाहता आहे. त्यांची भाषणं मला देखील आवडतात. म्हणून मी त्यांना ठाणे जिल्ह्यातील निवडणुकांच्या वेळी भाषणं करायला घेऊन जातो. आपल्या भाषणापेक्षा गुलाबरावाचं भाषण चांगलं होईल, लोकं क्रेडीट देतील म्हणून त्यांचं भाषण रोखण्यात आलीय, असा गौप्यस्फोटदेखील मुख्यमंत्र्यांनी केला. ज्या गुलाबरावांनी बाळासाहेबांची शिवसेना वाढवली, त्याच गुलाबरावांचे पाय खेचण्यात आलेत.
गुलाबरावांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केलाय
शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीचे एका आमदाराने मला सांगीतले की, मतदार संघात मोठी पाणीयोजना आणतोय. त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. असे करत करत चौथी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर टेंडर निघाले. काम सुरु होईपर्यं निवडणुका आल्या. मग योजना थंडबसत्यात गेली. सर्व कामे एकत्रित केली तर लोक निवडून देणार नाहीत, असं सांगितले. मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला.
बाळासाहेबांचे स्वप्न भाजपने पूर्ण केले
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मतदार संघात सांगण्यात आले, मोठी पाणीयोजना आणतोय. त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. असे करत करत चौथी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर टेंडर निघाले. काम सुरु होईपर्यं निवडणुका आल्या. मग योजना थंडबसत्यात गेली. सर्व कामे एकत्रित केली तर लोक निवडून देणार नाहीत. मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अयोध्येतील राममंदीर हे बाळासाहेबांचे स्वप्न आज भाजपने पूर्ण केले. तर मग आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर कोणता गुन्हा केला? असा सवाल देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
…म्हणून हे पाऊल उचलले !
आम्हाला बाळासाहेबांचे विचार धाडसाने पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. बाळासाहेबांची इच्छा काय होती, काश्मिरमधील 370 कलम हटवा. मला एक दिवस पंतप्रधान करा मी हे काम करेल, असे बाळसाहेब म्हणायचे. आणि ती इच्छा मोदी आणि शहांनी पूर्ण केला. राममंदीर व्हावे हे देखील बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्याचे काम सुरु आहे. मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला? बेंबीच्या देठापासून का ओरडताय. तुम्ही असंगाशी संग केला, तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
200 क्रॉस झालो तरी नवल वाटायला नको
भाजपचे 106 आणि आम्ही 50 आमची संख्या आज 156 च्या पुढे 170 पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आता फक्त 30 चा आकडा गाठायचा आहे. 200 क्रॉस झालो तरी नवल वाटायला नको. ग्रामपंचायतींच्या निकालांवरुन हे आपल्याला काल दिसून आले. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशाने, जगाने आम्हा 50 लोकांची दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.