फैजपूर (प्रतिनिधी) फैजपूर उपविभागीय अधिकारी व यावल तहसिलदार यांच्या गेल्या आठवड्यात बदल्या झाल्या होत्या.त्यांच्या जागी आता उपविभागीय अधिकारी म्हणून कैलास कडलग यांनी तर यावल तहसिलदार म्हणून महेश पवार यांनी पदभार स्वीकारला. कोरोना महामारीच्या सावटा नंतर रावेर यावल परिसरात झालेल्या या सर्वात मोठ्या प्रशासकीय बदल्या ठरल्या आहेत. फैजपूर, यावल, रावेर परिसरात सध्या वाळु तस्करांनी उच्छाद मांडलेला असुन राजरोसपणे वाळुची चोरटी वाहतूक प्रशासनाच्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात मागील तीन महिन्यांपासून फैजपूर व परिसरात सायंकाळी सात नंतर बिनधास्तपणे वाळुची वाहतुक सुरू असुन प्रशासनाचा कोणताही वचक राहीलेला नाही की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना काळात महसूल प्रशासन कोविड सेंटर तसेच कोरोना विषयी विविध कामांमध्ये व्यस्त असतांना वाळु तस्करांनी राजरोसपणे वाळू उपसा करत प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. वाळू तस्करीमुळे पर्यावरणावर परिणाम होत असुन महसूल प्रशासनाचा लाखो रुपये महसूल देखील बुडत आहे. अशातच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या बदल्या झाल्याने नुतन अधिकारी या वाळू तस्करांवर कशा प्रकारे अंकुश ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुतन प्रांताधिकारी कडलग यांनी यापुर्वीही यावल तहसिलदारपदी काम केले असुन त्यांना परिसराची चांगलीच माहिती आहे तरीदेखील मधल्या काही वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने पुन्हा एकदा त्यांना आपले कसब दाखवून द्यावे लागेल. दरम्यान प्रांत कार्यालयात अवैधरित्या वावरणार स्वयंघोषित दलालांमुळे मागील काही दिवसांत दोन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या गोष्टीचे स्मरण ठेवून नुतन अधिका-यांना सजग रहावे लागेल. व दिवसभर कार्यालयात अवैधरित्या चकरा मारणाऱ्या दलालांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. स्वयंघोषीत दलालांचा प्रांत कार्यालय आवारातून उपद्रव कमी झाल्यास नागरीकांच्या मनात निश्चितच सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
फैजपूर यावल रावेर परिसरात कॉलनी, मुख्य रस्ते तसेच वर्दळीच्या, कारखान्याच्या मार्गाने देखील वाळूचे अवजड डंपर राजरोसपणे दिसतात. वाळु तस्करी चे वाढलेलं प्रमाण हे प्रशासनाच्या सहमतीने चालू आहे की महसूल विभाग कोरोना व इतर कामात व्यस्त असल्यामुळे वाळू तस्करी होत आहे ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून नूतन पदाधिकारी धडक कारवाईची मोहीम राबवून हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करणार का? हे लवकरच पहायला मिळेल.