नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ भारत-चीन सैनिकांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री समकक्ष वांग यी यांच्या भेटीआधी हा गोळीबार झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या एलएसीजवळ १०० ते २०० गोळ्यांचे राऊंड फायरिंग करण्यात आले. ही फायरिंग एकमेकांवर न करता हवेत करण्यात आली असल्याचेही वृत्त आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळील एलएसीवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. चीनचे जवळपास ५० हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य एलएसीवर तैनात केले आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे.