जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील एका गोदामातून तब्बल २३ लाख रूपयांचे टायर चोरी झाल्याबाबत १० सप्टेंबर रोजी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. परंतू तब्बल १८ दिवसानंतर एलसीबीने आरोपींवर ५१ हजाराचे बक्षीस जाहीर केले, तेव्हा अशी मोठी चोरी झाली असल्याबाबत जिल्हावासीयांना माहिती कळाली. त्यामुळे इतके दिवस या चोरीच्या गुन्ह्याबाबत लपवा-छपवी झालीय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाळधी येथे लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीच्या पलोड डिस्ट्रिब्युटर्सच्या ९ सप्टेबरच्या मध्यरात्री १ वाजता दोन ट्रक घेऊन चोरटे गोडाऊनच्या मागच्या बाजूस आले. पाच-सहा चोरटे खिडकीची काच फोडून, लोखंडी अँगल वाकवून आत शिरले. त्यांनी गोदामातून टायर, रेडीयल व ११ हजारांची रोकड असा २३ लाख २० हजारांचा ऐवज चोरून नेला. एका चोरट्याने पाणी पिण्यासाठी चेहर्यावरील मास्क बाजूला केले. त्यामुळे केवळ त्याचा एकट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला होता. यावरून संबंधीत चोरीच्या फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. यानंतर या चोराचे रेखाचित्र अर्थात स्केच जारी करण्यात आले असून या चोरट्याची माहिती देणार्यास ५१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांनी हे स्केच तयार केले.
दरम्यान,१० सप्टेंबरला सकाळी ही चोरी उघड झाल्यानंतर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. परंतू तब्बल १८ दिवस या गुन्ह्याची माहिती कुणालाही कशी कळाली नाही?, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. साधारण वर्षापूर्वी याच गोदामात १२ लाखाची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचाही तपास अद्याप प्रलंबित असल्याचे कळते. तर १०-१२ वर्षापूर्वी अनेक दिवस अशीच एक मोठी चोरी एका गोदामात झाली होती. त्यावेळी देखील अनेक दिवस कुणालाही काहीही माहित नव्हते. त्यावेळी देखील एलसीबीने तपासाला सुरुवात केल्यानंतर मोठी चोरी झाल्याचे जिल्ह्यातील नागरिकांना कळाले होते. पलोड डिस्ट्रिब्युटर्समधून एवढी मोठी झालेली चोरी ही पोलिसांच्या दृष्टीने आव्हान आहे. परंतू ही चोरी गोडावूनची सर्व माहिती असलेल्या व्यक्तीनेच केली असावी, असा एक अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गोदामात काम करणाऱ्यांसह काही जणांवर नजर ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणात इन्शुरन्सचा काही खेळ असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. तसेच चोरटे आठ ते दहा जण असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.