जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना, फैजपूर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड करतांना, शासनाने विहीत कलेल्या प्राचार्य निवड प्रकिया संपूर्णपणे डावलण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका तक्रारी ‘ई-मेल’द्वारे केली आहे.
मालपुरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, लोकडाऊनमुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणच्या सर्व मुलाखती रद्द केलेल्या असताना, तसेच काही महाविद्यालयातील जाहिराती आधी मंजुर असतांना सुद्धा निवड प्रक्रियेसाठी समिती न नेमू देता, सपूर्ण प्रक्रिया बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. असे असतांना, फक्त धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर या महाविद्यालयासाठी प्राचार्य निवडीसाठी असलेले सर्व नियम डावलून लॉकडाऊन असतांना विशिष्ट खास मर्जीतील कर्मचाऱ्यांना विद्यापीठात बोलावून, अतिशय तडकाफडकी व इतर संस्थांना डावलून फक्त धनाजी नाना महविद्यालयासाठी समितीची निवड करण्यात आली. या काळात सर्व मुलाखती रद्द झालेल्या असतांना, प्राचार्य पी. आर. चौधरी हे दि. ३१ मे २०२० रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम डावलून, कुलगुरु प्रा. पी. पी. पाटील, प्र. कुलगुरु प्रा. पी. पी. माहूलीकर, व प्र. कुलसचिव प्रा.बी. व्ही. पवार यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व नियम व प्रकिया डावलून इतर कोणालाही मुलाखत पत्र न पाठविता, मर्जीतील प्रा. पी. आर. चौधरी यांना प्राचार्य पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
तरी सदरची निवड प्रक्रिया ही प्रथमदर्शनीच सदोष दिसून येत असून, याची सखोल चौकशी होवून, संबंधीतांवर कार्यवाही करण्यात यावी. कारण शिक्षण क्षेत्रात अशा मार्गाने भरती व्हायला लागली तर, अनेक विद्यार्थांचे नुकसान होवून, चांगल्या गुरुजनांचा पासून विद्यार्थी वंचीत राहतील. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन योग्य प्रक्रिया राबवून, डावलल्या गेलेल्या सदस्यांना न्याय द्यावा, असे मालपुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.