भुसावळ (प्रतिनिधी) शहरात शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. खून, दादागिरी, हप्ते वसुली, खंडणी सारखे गुन्हे नेहमीचेच झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शहराची परीस्थित अधिक खराब होऊ नये, म्हणून भुसावळला आयपीएस दर्जाचा डीवायएसपी द्यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात श्री. गुंजाळ यांनी म्हटले आहे की, शहरत डॉक्टरांना धमकावणे, बिल्डर आणि ठेकेदार यांच्याकडून हप्ता वसुली करणे, सट्टा, पत्ते क्लब, दारू यासारखे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच राष्ट्रीय बँकेच्या व्यवस्थापकांना धमकी देणे, त्यांच्याकडून खोटे दस्तऐवज तयार करून कर्ज पास करून घेणे, शाळकरी मुलींना मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करून, धमकी देणे, महिलांना त्रास देणे, ब्लॅकमेलिंग करणे यासारखे प्रकार सुरु आहेत.
एवढेच नव्हे तर. पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही लाच मागता म्हणून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे. अगदी तुझी नोकरी खाऊन जाईन, तुला गोळी मारून देईल, तू मागतो असे खोटे आरोप करणे. त्याचप्रकारे अल्पवयीन लहान मुलांना गुन्हेगार बनविणे. यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची बाजू घेणारा म्हणून आयपीएस दर्जाचा डीवायएसपी किंवा एडिशनल एसपी यांची भुसावळ तालुक्यावर लवकरात लवकर नियुक्ती करावी, अन्यथा भुसावळ शहराला अजून गंभीर गुन्हेगारीला सामोरे जावे लागेल, असेही पत्रात नमूद केले आहे. या पत्राची एक प्रत गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना रवाना करण्यात आली आहे.