भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे व उपनिरीक्षक कैलास जाधव यांची औरंगाबाद लोहमार्गच्या नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली करण्यात आली असून त्याबाबत लोहमार्गचे पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी शनिवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास आदेश काढले आहेत. दरम्यान, भुसावळ लोहमार्गचा पदभार सुरज सरडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून रविवारी दुपारी त्यांनी निरीक्षक डंबाळे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
सूत्रांच्या माहितीनुसार, एका पोलिस कर्मचार्याची नागपूर आऊट साईटवर ड्युटी लावण्यात आल्यानंतर त्याची गैरहजेरी लावण्यात आल्यानंतर ड्युटी तपासणी अधिकारी उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यात त्यांच्याशी वाद झाला व कर्तव्य केल्यानंतर गैरहजेरी लावल्याने कर्मचार्याने संताप व्यक्त करीत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. दरम्यान, त्यानंतर हा कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती असून त्याच्या नातेवाईकांकडून त्याचा शोध घेतला जात आहे व याच कारणामुळे पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची बदली करण्यात आल्याचे समजते.
कर्मचार्याची गैरहजेरी घेण्यात आल्याने तक्रार करण्यात आली. मात्र घडलेल्या घटनेबाबत वरीष्ठांकडून विचारणा करण्यात आली नाही, असे बदली झालेले अधिकारी दिनकर डंबाळे यांनी सांगितले. भुसावळात आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत व यापुढे कर्तव्याला प्राधान्य देणार असून बदली मिळालेल्या ठिकाणाबाबत निश्चितच समाधानी असल्याचे डंबाळे म्हणाले.