मुंबई (वृत्तसंस्था) काही तासांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा आणखी तासाभरात पूर्ववत होईल, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.
महापरेषणच्या ४०० केव्ही कळवा पडघा जीएसआय केंद्रात सर्किट १ देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार असलेल्या सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित झाल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. सर्किट २च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आणखी तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होईल, असेही राऊत यांनी म्हटले. मुंबईसह इतर भागातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्याने सध्या गोंधळाचे वातावरण आहे.