ठाणे (वृत्तसंस्था) ठाण्यातील किसन नगर भागात ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार हाणामारी झाली आहे. ठाकरे गटाकडून मेळावा घेत असतांना शिंदे गटाचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे आले आणि दोन्ही गट आमने सामने आले. यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
ठाण्यातील वागळे इस्टेट हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. या परिसरात ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. यावेळी शिंदे गटातील कार्यकर्ते तिथे आले. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासमोरच हाणामारीचा हा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे, कायदा सुव्यवस्था राहिलच नाही अशी प्रतिक्रिया खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे दोन्ही गटांचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात जमा झाले होते. दोन्ही गट एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करीत असल्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले.कोणतीही अनुचित घडू नये, यासाठी श्रीनगर पोलिस ठाण्यात राज्य राखीव दलासह पोलिस मुख्यालयातील जादा कुमक तैनात केली आहे.