मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. याआधी पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.