जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. आज पोलिसांना चक्क व्हाट्सअॅपवर कल्याण-मिलन सट्टा खेळणारे आढळून आले. याप्रकरणी तब्बल १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, विकार कयूम खान (रा. पंचशील नगर, तांबापुरा जळगाव) हा फुकटपुरा भागात त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील व्हाट्सअॅपमधून लोकांकडून कल्याण-मिलन नावाच्या मटक्याचे आकडे घेतांना मिळून आला. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी वसीम खान यांच्याकडे खान साहेब, अझरूद्दीन शेख, दानिश भाई, एमडी सलीम टेलर, अशपाक मुल्ला, साहिल बतीजा नावाच्या लोकांनी सुद्धा सट्ट्यांचा आकडा लावलेला असल्याने त्यांना सुद्धा सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. विकार खानकडून ९५० रुपये रोख आणि सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत वसीम अफसर खान (रा.शिवाजी नगर) हा शिकलकरवाडा शिरसोली नाका येथे त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील व्हाट्सअॅपमधून लोकांकडून कल्याण-मिलन मटका नावाचे सट्ट्यांचे आकडे लावत असतांना मिळून आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यांमध्ये वसीम याच्याकडील मोबाईलमध्ये सलीम भाई, मस्तान, इरफान शेख, पहिलवान नावाच्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडे आकडा लावलेला असल्याने त्यांना सुद्धा सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. वसीमकडून १२५० रुपये रोख, पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलिस अधिकारी नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक लोकरे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, जितेंद्र राजपूत, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुकेश पाटील, विजय बावस्कर, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे.