साकळी (प्रतिनिधी) धरणगाव येथील कमल जिनिंग या शासकीय कापूस केंद्रावर शेतकऱ्याच्या कापूस विक्री व्यवहारात बेकायदेशीर व अनाधिकृतपणे तब्बल तीन क्विंटलची कट्टी (कटती) कापून कापसाचे कमी वजन कमी करत नुकसान केले म्हणून संबंधित शेतकऱ्याने जिल्हा सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत संबंधित जीन मालकाकडून शेतकऱ्याला तब्बल साडेतीन महिन्यांनी मोबदला मिळाला आहे.
निवेदनानुसार सविस्तर वृत्त असे कि, रेल ता.धरणगाव येथील रहिवासी शेतकरी डॉ.सुनील लक्ष्मण पाटील यांच्या व वडिलांच्या नावे शेतजमीन आहे. या शेतातून उत्पादित झालेला कापूस दि.१ जून २०२० रोजी धरणगाव येथील कमल जिनिंग या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आला. सदर शेतकऱ्याच्या कापसाचे निव्वळ वजन ६२ क्विंटल ६५ किलो असतांना संबंधित कमल जिनिंगचे मालक यांनी बेकायदेशीर व अनाधिकृतपणे कापूस कट्टी (कटती ) तब्बल ३ क्विंटल कापसाचे वजन कमी करून श्री. पाटील यांना ५९ क्विंटल ६५ किलो वजनाची पावती दिली. सदर चुकीच्या पावतीचा प्रकार लक्षात आल्यावर श्री.पाटील यांनी जिनिंगचे मालक यांना फोन करून कापूस कट्टी बाबत विचारले असता ‘त्या’ जिनिंग मालकाने अरेरावी भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या दरम्यानच्या काळात त्या जिनिंग मालकांनी शेतकरी डॉ.सुनिल पाटील यांचेशी संपर्क साधून नवीन पावती बनवून देतो असे सांगितले होते. पण दोन महिने होऊनही त्यांनी नवीन पावती किंवा मोबदला दिला नाही. उलट ते वेळ खाऊ धोरण घेत आहेत,अश्या आशयाची तक्रार डॉ सुनील पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे दि.१८ आँगस्ट २०२० रोजी जळगाव जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली होती.
सदर प्रकरणी कमल जिनिंग चे मालक यांना आपल्या स्थरावून दखल घेऊन कट्टी कटती कापसाचा मोबदला देण्याचे आदेश द्यावे व माझ्या केलेल्या आर्थिक फसवणूक व मानसिक त्रासाबद्दल त्यांना कायद्यानुसार कठोर शासन करावे असे निवेदनात म्हटले होते. सदर कापूस कट्टी (कटती) प्रकरणी दि.१४ रोजी संबधित अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले होते या पत्राची दखल घेत सहाय्यक निबंधक यांनी तातडीचे आदेश काढून दि.१८ रोजी तक्रारदार व जिनिंग चे मालक व ग्रेडर यांचे म्हणणे एकूण घेण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान बाजूंचे जाबजबाब घेण्यात आले. जिनमालक व ग्रेडर यांनी शेतकऱ्याचे म्हणणे ऐकून घेत समाधान करून कापूस कटती नुकसानीचा मोबदला दिला आहे,असे शेतकरी डॉ सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.