धरणगाव (प्रतिनिधी) सध्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम वेगात सुरू आहे. वीजेअभावी शेतातील उभी पिके जळून जात असल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान करून शिंदे फडणवीस सरकार काय साध्य करीत आहे? असा सवाल करून राज्य सरकारने तात्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी, अशी मागणी शिवसेनाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे. धरणगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे राज्य शासनामध्ये मंत्री आहेत. मात्र ते शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात गप्प आहेत, एक शब्दही बोलत नाहीत, अशी टीकाही गुलाबराव वाघ यांनी केली.
राज्य शासनाचे काम हे शेतकरी वर्गाला सहकार्य करण्याचे असते. मात्र सध्याचे शिंदे फडणवीस सरकार हे वीज रोहित्रे बंद करून शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. हे शासन सत्तेवर आल्यापासून प्रत्येकी 3/4 महिन्याला वीज तोडणी मोहीम राबवून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे काम करीत आहे. सध्या उन्हाळा चालू झाल्यामुळे पिकांना पाण्याची गरज असताना, राज्य सरकारकडून पाणी असूनही वीज बंद करून शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा हा प्रकार सुरु आहे, अशी टीका गुलाबराव वाघ यांनी केली. शेतकऱ्यांना महावितरणकडून आलेली बिले अव्वाच्या सव्वा अशी आहेत, सदरची बिले दुरुस्त करणे गरजेचे आहे. दोन वर्षांपासून प्रत्येक वीज तोडणीमध्ये शेतकऱ्याकडून काही रक्कम महावितरणकडून वसूल केली जात असून, थकबाकीचे मूळ दुखणे कायम राहत आहे.
सध्या शेती पंपाची वीज खंडित करण्यात येत असल्याने शेती धोक्यात आली आहे. शेतकरी बांधव हे अजूनही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना, महावितरणने शेतीपंपांची वीज तोडणी मोहिम तीव्र केल्याने शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देणेसाठी शिंदे फडणवीस सरकारने मोहीम थांबवून शेतीपंपाचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत सुरु करावा, अन्यथा शिवसेना ठाकरे गट वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला. तसेच सहायक कार्यकारी अभियंता रेवतकर यांना शेतकऱ्यांचा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, दीपक सोनवणे ,राष्ट्रवादीचे दीपक वाघमारे, बाळु पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अँड शरद माळी, राजेंद्र ठाकरे,नाना ठाकरे, शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी, धिरेंद्र पुरभे, जितेंद्र धनगर, शेतकरी संघटनेचे जयदीप पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील, एकनाथ महाले, किशोर पाटील, सुरेश महाजन,नंदू पाटील सीताराम मराठे, गणेश माळी, अरुण पाटील, राजेंद्र कोळी, रमेश पाटील, राजेंद्र शांताराम महाजन, सुनिल महाजन, नवल पाटील, जितेंद्र महाजन,संतोष सोनवणे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.