मुंबई (वृत्तसंस्था) महापालिकेच्या सायन रूग्णालयात मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक विभागातील दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे.
मुंबईतील सायन येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) याला २८ ऑगस्ट २०२० रोजी उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्यानंतर दुर्दैवाने अंकुशचे काल १३ सप्टेंबर २०२० सकाळी निधन झाले. अंकुशच्या मृतदेहावर सायन येथील स्मशानभूमीत दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह पॅकिंग करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबियांनी अंकुशच्या नातेवाईकांना सांगितले. दरम्यान, रुग्णालयाने या तरुणाची किडनी काढल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनीही किडनीचा भाग कापल्याचे दिसते असे म्हटले आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने मृतदेहाची आदलाबदल झाल्याचे मान्य केले असून किडनी काढल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणी अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.