धुळे (प्रतिनिधी) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार असल्याचे प्रशासन दौर्याच्या तयारीत असताना चोरट्यांनी शहरातील आग्रा रोडवरील बॉम्बे लॉजच्या शेजारील प्रकाश जोरावरमल चौधरी यांच्या स्वर्ण पॅलेस हे सोने-चांदीचे दुकानातून चोरट्यांनी एक कोटी 10 लाखांचा ऐवज लांबवला होता. या गुन्ह्याची उकल आझादनगर पोलिसांनी केली असून दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीसह जबरी चोरीचे 31 गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत. किशोरसिंग रामसिंग टाक (25, गुरुगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना) व झनसिंग ऊर्फ लकी जीवनसिंग जुन्नी, (28, नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर अन्य आरोपींचा जळगावातील साथीदार पसार झाला आहे.
एक लाख 72 हजारांचा ऐवज जप्त !
अटकेतील आरोपींकडून 60 हजार रुपये किंमतीची एक किलो 20 ग्रॅम चांदीच्या पट्टी स्वरूपात पाच लगड व 72 हजार रुपये किंमतीचे 14.430 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या तीन लगड तसेच 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून एक लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, संशयितांचा एक कुविख्यात साथीदार पसार असून त्याच्याकडे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी किशोरसिंग रामसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या वेगवेगळया जिल्हयांमध्ये एकूण 31 घरफोडीजबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई !
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगीरे, सहा.पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, हवालदार योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदीप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार व पारेराव आदींच्या पथकाने केली.