पाचोरा (प्रतिनिधी) प्रधानमंत्री योजनेचे घरकुल मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शेख हुसेन शेख बद्दु (वय 37, कुर्हाड बु., ता.पाचोरा), यास जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी अटक केली.
असे आहे लाच प्रकरण !
कुर्हाड, ता.पाचोरा येथील 34 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गावातील ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर आरोपी शेख हुसेन यांनी आपली पाचोरा पंचायत समितीतील अधिकार्यांसोबत ओळख असल्याने तुम्हाला मोदी आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर करून देतो मात्र त्यासाठी मला दहा हजार रुपये लाच स्वरुपात द्यावे लागतील, अशी मागणी 11 मार्च रोजी केली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी हुसेन शेख यांनी कुर्हाड गावात लाचेची रक्कम स्वीकारण्याचे कबूल करताच सापळा रचण्यात आला व त्यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. आरोपीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा !
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, चालक हवालदार सुरेश पाटील, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, प्रदीप पोळ, अमोल सूर्यवंशी, राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.